नवी दिल्ली - देशात वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. याच दरम्यान कोरोना संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 718 पैकी 400 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोना एकही रुग्ण तिथे आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना कोरोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे 2-3 आठवडे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
चीनमध्ये 7 जानेवारीला कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर आपण 8 जानेवारीपासून तज्ज्ञांची बैठक बोलावली होती. यानंतर 17 जानेवारीला केंद्र सरकारने आरोग्यासंबंधीचे दिशानिर्देशही जारी केले अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तसेच बिहारमधील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. पण महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. खास करून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कर्नाटकमध्येही स्थिती बिघडली आहे. पण तिन्ही राज्यांच्या सचिवांनी दाखवलेल्या विश्वासाने आम्ही समाधानी आहोत. केंद्र सरकारच्या आदेशांनुसार आसाममध्येही विदेशी दारूची सर्व दुकानं आणि बॉटलिंग प्लांट्स, डिस्टलरीज आणि ब्रुअरीज बंद राहणार असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.
देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 39 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 392 इतकी झाली आहे. तर 1344 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे सांगितले. याशिवाय, 20 एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाण एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमधून वगळण्याची शक्यता नरेंद्र मोदी यांनी वर्तविली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू
CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'