नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट जास्त जीवघेणी ठरली आहे. दुसऱ्या लाटेत मृतांची संख्या जास्त आहे. या लाटेत देशभरातील ४०० हून अधिक डॉक्टारांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकट्या दिल्लीतील १०० डॉक्टरांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या काही दिवसापासून दररोज होणारे मृत्यू वाढले आहेत. मात्र, यावेळी वैद्यकीय क्षेत्राला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट झालेला दिसत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेत ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १०० डॉक्टर्स एकट्या दिल्लीतील आहेत. ही आकडेवारी देशातील सध्याच्या परिस्थितीत सरकारची चिंता वाढविणारी आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे वैद्यकीय क्षेत्रावर प्रचंड ताण आलेला आहे. दररोजची रुग्णसंख्या अजूनही अडीच लाखाच्यावर आहे. अशास्थितीत देशाला डॉक्टरांची गरज भासणार आहे.
सलग सहाव्या दिवशी तीन लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंदकोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काही दिवसांपासून घट होत आहे. गेल्या २४ तासांममध्ये २ लाख ५७ हजार २९९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण बरे झाले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. देशात सलग सहाव्या दिवशी तीन लाखांपेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९०वर पोहोचली आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटून २९ लाख २३ हजार ४०० पर्यंत घटली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटही वाढून ८७.७६ टक्क्यांवर पोहोचलाआहे. ४ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपासून मृतांचा आकडा ४ हजारांच्या वर असून त्यात घट होत नसल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ८६ हजार ६१८ मृत्यू झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये २४,२०७, दिल्लीत २२,८३१, तामिळनाडूत १९,५९८, उत्तर प्रदेशात १८,७६० आणि पश्चिम बंगालमध्ये १४ हजार ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक १२६३ मृत्यू महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर तामिळनाडूत ४६७, कर्नाटकमध्ये ३५३, दिल्लीत २५२ आणि उत्तर प्रदेश तसेच पंजाबमध्ये प्रत्येकी १७२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये घट होत असल्याची दिलासादायक बाब असली तरी मृत्यूचे प्रमाण घटत नाही. दररोज ४ हजारांहून अधिक मृत्यू होत आहेत. एकूण २ लाख ९५ हजार ५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर १.१२ टक्के एवढा असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.कॅनडाकडून विमानसेवेवर निर्बंध कायमभारतातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे कॅनडाने भारत आणि पाकिस्तानातून दाखल होणाऱ्या प्रवासी विमानांवरील बंदी आणखी ३० दिवसांनी वाढविली आहे. ही बंदी २१ जूनपर्यंत लागू राहणार आहे.