नवी दिल्ली : देशात शुक्रवारी ३९,७२६ नवे रुग्ण आढळून आले. हा यंदाच्या वर्षीचा, तसेच गेल्या ११० दिवसांतील सर्वांत मोठा आकडा आहे. शुक्रवारी १५४ जण मरण पावले असून, ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. कोरोना बळींची संख्या १ लाख ६० हजारांच्या घरात पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.२६ टक्क्यांपर्यंत खाली घसरले आहे. २९ नोव्हेंबर रोजी देशात कोरोनाचे ४१,८१० नवे रुग्ण सापडले होते. आता हा आकडा काही दिवसांत गाठला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८ टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी भारताने कमी मृत्युदर राखण्यात यश मिळविले आहे. कोरोनातून बरे झालेल्या ६५ वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सहा महिन्यांनंतर पुन्हा या संसर्गाची बाधा होण्याचा मोठा धोका आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.
चीनच्या वन्यप्राणी केंद्रांत उगमस्थानकोरोनाचा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेतून हवेत मिसळल्याची शक्यता नाकारतानाच, या विषाणूचे उगमस्थान दक्षिण चीनमधील वन्यप्राणी पालनकेंद्रात असावे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर दसझॅक यांनी केला आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी चीनचा दौरा केला, त्यात पीटर यांचा समावेश होता.