नवी दिल्ली - लॉकडाऊनसह विविध उपाययोजना केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, दिल्लीतील कापसहेडा येथील ठेकेवाली गल्ली परिसरात असलेल्या एका इमारतील तब्बल ४१ कोरोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच वेळी आणि एकाच इमारतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, दक्षिण-उत्तर दिल्लीतील डीएम ऑफीसकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल रोजी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ही इमारत सील करण्यात आली होती. सर्वसाधारणपणे तीनपेक्षा अधिक रुग्ण सापडल्यावर परिसर सील करण्यात येतो. मात्र येथे असलेल्या दाट लोकवस्तीमुळे एक रुग्ण सापडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आला होता. तसेच येथील सर्व लोकांचा कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी आला असून, त्यामध्ये या इमारतीत राहणाऱ्या ४१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
कापसहेडा परिसरात दाट लोकवस्ती आहे. तसेच यामध्ये मजुरांचे प्रमाण लक्षणीय आहे. दिल्ली आणि गुरगाव येथील कारखान्यात काम करणारे कामगार येथेच राहतात. सुमारे सव्वालाख लोक या दाट लोकवस्तीत राहतात. त्यामुळे येथील एकाच इमारतील ४१ कोरोनाग्रस्त सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एकूण ३ हजार ७३८ कोरोनाबाधित आहेत. तसेच दिल्लीमध्ये आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे दिल्लीत आतापर्यंत ११६७ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिल्लीला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अधिकाधिक कोरोना चाचण्या घेण्यावर भर दिला आहे.
दरम्यान, सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिगच्या अंमलबजावणीनंतरही देशातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल २२९३ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजार ३३६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत २ हजार २९३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर या २४ तासांत देशभरात ७१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सकापर्यंत देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ३३६ पर्यंत पोहोचली आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशभरात आतापर्यंत ९ हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी २६.६४ टक्क्यांवर पोहोचली आहे.