नवी दिल्ली : देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ४३ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांतील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, चाचण्यांची संख्या वाढविणे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगण्यात आले आहे.देशात गत २४ तासांत कोरोनाचे ७८,५१२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण सात राज्यांतील आहेत. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक २१ टक्के रुग्ण आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेशातील १३.५ टक्के आणि कर्नाटकातील ११.२७ टक्के रुग्ण आहेत. तामिळनाडूतील रुग्णांचे प्रमाण ८.२७ टक्के आहे. देशात गत २४ तासांत ७८,५१२ रुग्ण आढळून आलेआहेत.त्यामुळे रुग्णांची संख्या आता ३६ लाखांवर पोहोचली आहे, तर २७,७४,८०१ लोक बरे झाले असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७६.६२ टक्के आहे. गत २४ तासांत ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ६४,४६९ झाली आहे.आॅगस्टमध्ये चाचण्यांची क्षमता दररोज १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. देशात आतापर्यंत ४.२३ कोटी चाचण्या झाल्या आहेत. गत २४ तासांत ८ लाख ४६ हजारांवर चाचण्या झाल्या आहेत.
coronavirus: ४३ टक्के रुग्ण महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातील, ४ कोटींवर चाचण्या, दररोज १० लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 5:46 AM