नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र यात दरम्यान एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये खासगी शिकवणी (ट्यूशन) घेणं एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडलं आहे. लॉकडाऊनमध्ये आमच्या शिक्षिका क्लास घेतात अशी तक्रार एका 5 वर्षांच्या चिमुकल्याने थेट पोलिसांकडे केल्याची घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये पोलिसांना एक व्यक्ती दोन लहान मुलांना बाहेर घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याबाबत व्यक्तीकडे चौकशी केली असता, 5 वर्षांच्या चिमुकल्याने सत्य सांगत आमच्या शिक्षिका ट्यूशन घेतात अशी तक्रार पोलिसांकडे केली. एवढेच नाही तर तो पोलिसांना घेऊन शिक्षिकेच्या घरी देखील गेला.
पोलिसांनी मुलांच्या नातेवाईकांकडे ट्यूशनबाबत चौकशी केली. तसेच त्यांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह यांनी 'लोकांना लॉकडाऊनमध्ये घरी थांबायला सांगितलं जात आहे. आम्ही वारंवार बाहेर पडू नका असं आवाहन करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना शिकवणीसाठी पाठवत आहात. शाळा बंद आहेत मग तुम्ही मुलांना का बाहेर पाठवत आहात?' अशी विचारणा केली आहे. तसेच या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलगा पोलिसांना घेऊन शिक्षिकेच्या घऱी गेला. तेव्हा शिक्षिकेने आपण ट्यूशन घेत नसल्याचा दावा केला. पण मुलाने त्या खोटं बोलत असून अजून तीन मुलं शिकवणीसाठी येतात अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी शिक्षिकेला आणि मुलांच्या कुटुंबियांनाही चांगलंच खडसावलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे. तसेच दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला असून, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात 381 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी 22.17 झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजारांजवळ, 24 तासांत 48 जणांचा मृत्यू
Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज