- हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संकेतस्थळावर अपलोड केलेल्या माहितीची छाननी केल्यावर हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, दशलक्षावधी स्थलांतरितांनी कोरोना विषाणूचा फैलाव केलेला नाही.स्थलांतरित मजूर/कामगारांना त्यांच्या घरी जाऊ दिले तर ते कोरोना विषाणूचा फैलाव करतील, असे चित्र या विषयातील तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांनी समोर मांडले होते. काही दशलक्ष संख्येत स्थलांतरित मजूर/कामगार परतलेल्या तीन राज्यांच्या आणि एवढ्याच संख्येने स्थलांतरित मजूर/कामगार बाहेर पाठवलेल्या तीन राज्यांच्या संकेतस्थळावरील माहितीचा ‘लोकमत’ने अभ्यास केला.या माहितीतून हे स्पष्ट होते की, हे स्थलांतरित परतलेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये अस्वस्थ करणारी वाढ झाल्याचा कोणताच कल दिसलेला नाही. वस्तुस्थिती ही आहे की, अभ्यास करण्यात आलेल्या दिवसांत (७ ते १३ जून) बिहारमध्ये रुग्णांच्या संख्येत घट दिसली. सात जून रोजी ३१९ रुग्ण होते तर १३ जून रोजी ती संख्या १२० होती. उत्तर प्रदेशतही रुग्ण संख्येत नाममात्र वाढ दिसली तीही शहरांमध्ये. ग्रामीण भागांत नाही.राज्यांकडे जवळपास ६० लाख स्थलांतरित आले. विशेष म्हणजे या राज्यांनी याच कालावधीत चाचण्यांची संख्याही लक्षणीय वाढवली आहे. प्रत्येक १०० रुग्णांमागे अनैसर्गिक वाटावी अशा वाढीची टक्केवारी नाही ती एका ठराविक अंतरावरच राहिली.महाराष्ट्रात सात जून रोजी २७३९ रुग्ण होते. ती संख्या १३ जून रोजी ३४९३ झाली तर दिल्लीत हीच संख्या १३२० पासून २१२६ वर गेली. हाच कल पंजाबमध्येही आहे. या राज्यांमध्ये चाचण्यांची संख्याही याच कालावधीत वाढली व तेथे चाचण्यांची संख्या कमी झाल्याचा आरोप आपोआपच खोटा ठरला. या वस्तुस्थितीवर भाष्य करायला सरकारमधील कोणीही तयार नाही.
CoronaVirus News: ६० लाख स्थलांतरित कामगारांनी कोरोनाचा फैलाव केलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 4:29 AM