मुंबई - देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढीने कमालीचा वेग घेतला असून, गुरुवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चिंताजनक पातळी गाठली आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६ हजार ८८ कोरोनाग्रस्त सापडले असून, आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या कोरोनाबाधितांची ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. तसेच या २४ तासांत १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे या २४ तासांत देशभरात ३ हजार २३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात ६ हजार ८८ रुग्णांची वाढ झाली त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. दरम्यान, या काळात १४८ जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ हजार ५८३ वर पोहोचली आहे. तर याच काळात ३२३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा ४८ हजार ५३४ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत देशामध्ये ६६ हजार ३३० कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशातील राज्यवार विचार केल्यास महाराष्ट्रात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात कालही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत २३४५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४१ हजार ६४२ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रापाठोपात तामिळनाडूनमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. येथे काल दिवसभरात ७७६ नवे रुग्ण आढळल्याने येथील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ हजार ९६७ वर पोहोलची आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाचे १२ हजार ९०५ आणि दिल्लीमध्ये ११ हजार ६५९ रुग्ण झाले आहेत.