नवी दिल्ली : दिल्लीत कोविड-१९ च्या रुग्णांच्या दुरुस्तीचे प्रमाण ६७ टक्के आहे. ही अत्यंत समाधानकारक बाब असली तरी समाजमाध्यमांवर ज्या पोस्ट फिरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा पुन्हा रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असेल, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
केजरीवाल म्हणाले जूनअखेर दिल्लीत रुग्णांची संख्या एक लाखावर जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु कोविड-१९ चा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणेने उत्तम काम केले. दिल्लीतील लोकांनी नियम पाळले. त्यामुळे ही वाढ थोपविता आली. जूनअखेर दिल्लीत ८७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ५८ हजार रुग्ण दुरुस्त झालेत. दिल्लीत रुग्ण दुरुस्तीची टक्केवारी ही ६७ टक्के होती. दिल्लीत पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ही केवळ २६ हजार आहे. जूनअखेर ६० हजार रुग्ण पॉझिटिव्ह असतील, असा अंदाज होता. दिल्लीत रुग्णांंच्या मृत्यूची आकडेवारी घसरली आहे. दररोज ६० ते ६५ रुग्ण दगावतात. हा आकडा १२५ पर्यंत पोहोचला होता, याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले.
दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आधीच्या तुलनेत कमी होत आहेत. त्यामुळे आता कोरोना परतीच्या मार्गावर आहे, असे काही मान्यवर लोकांकडून समाजमाध्यमांमध्ये पोस्ट टाकल्या जात आहेत. या पोस्टमुळे लोक नियमांचे पालन करणार नाहीत. त्यामुळे दिल्लीतील स्थिती आधीसारखीच होऊ शकते. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका व नियमांचे पालन करा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत उच्चांकी ५०७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या त्यामुळे साडेसतरा हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १३ हजार १५७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ८५ हजार ४९३ झाली आहे.गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधित आढळण्याचा वेग थोडाफार कमी झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळपर्यंत देशात १८ हजार ६५३ कोरोनाबाधितांची भर पडली. यातील ३ लाख ४७ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर देशातील विविध रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १७ हजार ४०० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.