नवी दिल्ली - देशातील कोरोनाच्या संसर्गाने भयानक वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रविवारी मोठी वाढ नोंदवली गेली. रविवारी २४ तासांत कोरोनाचे तब्बल सहा हजार ९७७ नवे रुग्ण आढळल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत देशभरात १५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४०२१ झाली आहे. आतापर्यंत ५७ हजार २० जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थिती देशात कोरोनाचे ७७ हजार १०३ रुग्ण आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल देशात कोरोना रुग्णांची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत देशात सहा हजार ९७७ रुग्ण आढळले. तर या काळात १५४ जणांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात ३ हजार २८० जणांनी कोरोनावर मात केली.
दरम्यान, कोरोनामुळे महाराष्ट्रातील स्थिती अधिकच खराब झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पार पोहोचला आहे. रविवारी राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल ३ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. एकट्या मुंबईत कोरोनाचे ३० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३ हजार ४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला. राजधानी मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ७२५ रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोना बाधितांची संख्या ३० हजार ५४२ वर गेली. २४ तासांमध्ये मुंबईत ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ९८८ कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव आणि प्रदीर्घ काळ लागू कराव्या लागलेल्या लॉकडाऊनबाबत सरकारला सल्ला देत असलेल्या तज्ज्ञांनी आता वेगळा सूर आळवायला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांच्या आणीबाणीच्या परिस्थितीतील टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि लॉकडाऊनवरील टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी १६ मेपर्यंत कोविड-१९चे रुग्ण शून्यावर येतील हा आधी केलेला दावा मागे घेतला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोकणात जाण्यासाठीच्या ई-पाससाठी प्रत्येकी पाच हजारांचा रेट, नितेश राणेंचा गंभीर आरोप
कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
पॉल यांचा अंदाज आता असा आहे की, भारतात अजून रुग्णवाढीचे टोक गाठले जायचे असून, ते जूनअखेर घडू शकते. टास्क फोर्सचा दावा असा आहे की, लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या १४ ते २८ लाख होणे आणि मृत्यू ७८ हजारांपर्यंत जाणे टाळले. नेमकी संख्या किती असेल हे मात्र फोर्स सांगू शकला नाही.