गुवाहाटी - संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे आजवर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या काळात माणूसकीला काळीमा फासणाऱ्याही अनेक घटना समोर आल्या. कोरोना झाला म्हणून कुणी आपल्या आप्तांना घराबाहेर काढले, तर कुणी नातलगांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्याक घ्यायलाही नकार दिला. मात्र, सर्वत्र कोरोनाची आशी दहशत असतानाच अथवा भयाचे वातावरण असतानाच, आसाममधून हृदयाला स्पर्शी करून जाणारी एक घटना समोर आली आहे. येथे एका सुनेने आपल्या वृद्ध कोरोना बाधित सासऱ्यांना पाठीवर बसून थेट रुग्णालय गाठले. या सुनेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या घटनेचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (CoronaVirus 75-year-old father-in-law infected with corona, Daughter in law carried them to hospital)
निहारीका असे या सुनेचे नाव आहे, तर थुलेश्वर दास असे त्यांच्या सासऱ्याचे नाव आहे. थुलेश्वर दास हे 75 वर्षांचे आहेत. निहारीका याचे पती सुरज हे कामानिमित्त घरापासून दूर राहतात. यामुळे पतीच्या गैरहजेरीत निहारीका याच आपल्या सासऱ्यांची काळजी घेतात. ते भाटीगावच्या राहा येथील रहिवासी आहेत.
थुलेश्वर दास यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच, निहारीका यांनी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता, त्यांना आपल्या पाठीवर बसवून उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आणि रुग्णालय गाठले. निहारिका यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी थुलेश्वर दास यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले आणि निहारीका यांना होम आयसोलेशनमध्ये राहाण्याचा सल्ला दिला. मात्र, सासऱ्यांना एकट्यालाच रुग्णालयात ठेवण्यास निहारीका यांनी नकार दिला. यानंतर डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार करून या दोघांनाही रुग्णवाहिकेने नागाव भोगेश्वरी फुकानानीसिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली.