Coronavirus: अरेरे! कोरोना उपचारासाठी शेतकऱ्याने पाण्यासारखा ओतला पैसा; ८ महिन्यात ८ कोटी झाला खर्च, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 11:24 AM2022-01-13T11:24:48+5:302022-01-13T11:26:29+5:30
Coronavirus: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यावर परदेशातील डॉक्टरांनी येऊन उपचार केले तरी शेवटी जे व्हायचे तेच झाले.
रिवा: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट जगभरात घोंगावत आहे. या कोरोना संकट काळात लाखो लोकांनी प्राण गमावले. मात्र, मध्य प्रदेशातील रिवा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनातून बरे होण्यासाठी एका प्रगतीशील शेतकऱ्याने पाण्यासारखा पैसा ओतला. कोरोनाची लढाई लढण्यासाठी ८ महिन्यांच्या कालावधीत जवळपास ८ कोटी रुपये खर्च केले. मात्र, कोरोनाविरोधातील लढाईत शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, रिवा येथील ५० वर्षीय धर्मजय सिंह नामक प्रगतीशील शेतकऱ्याला एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोग्यात अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. त्यामुळे अखेर सिंह यांना एअरलिफ्ट करून चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी सुमारे ८ महिने सिंह यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु, अखेरीस मंगळवारी सिंह यांचा मृत्यू झाला. या ८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनावरील उपचारासाठी धर्मजय सिंह यांचे ८ कोटींहून अधिक रुपये खर्च झाले होते.
लंडनमधील डॉक्टर करत होते उपचार
अपोलो रुग्णालयात धर्मजय सिंह यांच्यावर स्थानिक डॉक्टरांसह लंडन येथील डॉक्टरही उपचार करत होते. धर्मजय सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग पोहोचला होता. यानंतर तो वाढला. डॉक्टरांचे उपचार सुरू असतानाच सिंह यांची किडनी फेल झाली आणि ब्रेन हॅमरेजही झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर धर्मजय सिंह यांच्यावर २५४ दिवसांहून अधिक काळ उपचार सुरू होते. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी धर्मजय सिंह यांच्यावर रिवा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यानंतर अपोलो रुग्णालयात सिंह यांना एक्मो मशिनवर ठेवण्यात आले. या मशिनचा एका दिवसाचा खर्च १ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय डॉक्टरांची फी, औषधांवरील खर्च वेगळा आकारला जात होता. देश-परदेशातील डॉक्टर सिंह यांच्यावरील उपचारात मदत करत होते. ऑनलाइन सल्लेही घेतले जात होते. मात्र, ब्रेन हॅमरेज होऊन अखेर धर्मजय सिंह यांचे निधन झाले.
उपचारांसाठी ५० एकर जमीन विकली
धर्मजय सिंह यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपली ५० एकर जमीनही विकली. धर्मजय सिंह एक प्रगतीशील शेतकरी होते. तीन भावंडांकडे मिळून हजारो एकर वडिलोपार्जित जमीन असल्याचे सांगितले जात आहे. धर्मजय भावंडांमध्ये सर्वांत लहान होते. धर्मजय सिंह यांचे वडील बंधू अधिवक्ता आणि समाजसेवी आहेत. तर मधले भाऊ चित्रकूट येथील ग्रामोदय विद्यापीठात कार्यरत आहेत. सिंह यांना राष्ट्रपतींकडूनही सन्मानित करण्यात आले आहे. धर्मजय कोरोना काळात खूप समाजसेवा करत होते. याच काळात त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.