नवी दिल्ली - लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंग यांचे पालन होत असतानाही देशातील कोरोनाबधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताजा आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 826 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 759 वर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत 1515 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. 28 मार्च रोजी देशातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा एक हजारावर पोहोचला होता. त्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसात तर कोरोनाबाधितांचा आकडा सरासरी हजाराने वाढत आहे.
दरम्यान, कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनविरोधातील लढाईत इतर देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थितीत असल्याचा दावा मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. कोरोना विषाणूच्या फैलावासंबंधीची जागतिक आकडेवारी पंतप्रधानांच्या या दाव्याला दुजोरा देत असल्याचे समोर आले आहे. अमेरिका, इटली, जर्मनी, स्पेन या विकसित देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत.
जगभरात प्रत्येकी 10 लाख लोकांमागे सरासरी 17.3 कोरोनाबाधित लोकांचा मृत्यू होत आहे. तर भारतात हेच प्रमाण केवळ 0.3 एवढे आहे. अमेरिकेत दर दहा लाख लोकांमागे 86 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतर देशांचा विचार केल्यास हे प्रमाण स्पेनमध्ये 402, इटलीमध्ये 358 आणि फ्रांसमध्ये 261 एवढे आहे.
जगभरात दर दहा लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचा आकडा 267 एवढा आहे. अमेरिकेमध्ये दर 10 लाख लोकांमागे कोरोनाबाधितांचे प्रमाण 1496 एवढे आहे. तर स्पेनमध्ये 3 हजार 864, इटलीमध्ये हजार 732 आणि फ्रांसमध्ये 2 हजार 265 एवढे आहे. तर भारतात मात्र दर 10 लाख लोकांमागे केवळ 7 कोरोनाबाधित आहेत.