नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. अशातच काही ठिकाणी डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षेची उपकरण मिळत नसल्याचं समोर आलं होतं. कोरोना रुग्णावर उपाचार करणारे आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असतात.
आतापर्यंत देशात ९० डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. देशात ८ हजार ३५६ कोरोना रुग्ण झाले आहेत. गेल्या २४ तासात ९०९ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षण आढळतात. तर २० टक्के रुग्णांना आयसीयूची गरज लागते असं सांगण्यात आलं आहे.
मात्र डॉक्टरांना झालेली कोरोनाची लागण ही चिंताजनक आहे. देशात १४ एप्रिलनंतरही अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं अशी सूचना वारंवार करण्यात येते. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जर कोरोनाची लागण झाली तर रुग्णांवर उपचार करणार कोण? असा सवाल देखील उपस्थित होऊ शकतो.
दरम्यान, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्येही एका नर्सला कोरोनाची लागण झाल्यानंतर तात्काळ तिच्या संपर्कात आलेल्या इतर ३० नर्सला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.