नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गातून ९२.५३ लाख लोक बरे झाले असून त्यांचे प्रमाण ९४.७४ टक्के आहे. गुरुवारी कोरोनाचे आणखी ३१,५२१ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ९७.६७ लाख झाली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बरे झालेल्यांची संख्या ९२,५३,३०६ असून कोरोना रुग्णांचा आकडा ९७,६७,३७१ आहे. गुरुवारी आणखी ४१२ जण या आजाराने मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,४१,७७२ झाली आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा ३,७२,२९३ असून ते प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ३.८१ टक्के आहे. जगभरात ६ कोटी ९२ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी ४ कोटी ८० लाख रुग्ण बरे झाले असून १५ लाख ७६ हजार लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेत २४ तासांत ३ हजार मृत्यू अमेरिकेमधील कोरोनाचे थैमान वाढत असून तिथे बुधवारी या आजाराने तीन हजार बळी घेतले. या देशात १ कोटी ५८ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील ९२ लाख ३१ हजार रुग्ण बरे झाले. ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६७ लाख आहे. फायझरच्या लसीमुळे चार अमेरिकी स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर तात्पुरता दुष्परिणामवॉशिंग्टन : फायझरच्या कोरोना लसीच्या अमेरिकेतील मानवी चाचण्यांदरम्यान चार स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर तात्पुरता दुष्परिणाम (फेशियल पॅरालिसिस- बेल्स पालसी) झाला होता. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या लसीच्या परिणामांवर अधिक बारीक लक्ष ठेवले आहे. अमेरिकेत या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबत विचार करण्यासाठी गुरुवारी तज्ज्ञ समितीची बैठक झाली. त्यात या सर्व बाबींवर बारकाईने चर्चा झाली. स्पुटनिक लस घेणाऱ्यांनी दोन महिने सोडावे मद्यपानरशियाने बनविलेली स्पुटनिक व्ही लस टोचून घेणाऱ्यांनी किमान दोन महिने मद्यपान वर्ज्य करावे. मद्यामुळे कदाचित दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. या लसीचा पहिला डोस टोचून घेण्याच्या दोन आठवडे आधीपासून मद्यपान बंद करावे. त्यानंतर एकूण ४२ दिवस त्यांनी मद्याला स्पर्श करू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गरीब देशांतील अनेक जण राहणार लसीपासून वंचितकोरोना लसीच्या निर्मिती व पुरवठ्याबाबत श्रीमंत देशांनी सर्व सूत्रे आपल्या हातात ठेवली असून, त्यामुळे ७०हून अधिक गरीब देशांतील प्रत्येकी १० पैकी ९ जणांना पुढच्या वर्षी कोरोना लस उपलब्ध होणार नाही, असे दी पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स या संस्थेने म्हटले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या साठ्यापैकी ५३ टक्के साठा श्रीमंत देशांच्या ताब्यात आहे. ही लस तत्काळ खरेदी करण्यासाठी गरीब देश सक्षम नाहीत. अगोदर श्रीमंत देशच ही लस खरेदी करतील. त्यामुळे गरीब देशातील रुग्णांना लस मिळण्यासाठी वाट पहावी लागेल.
coronavirus: देशात 94 टक्के कोरोना रुग्ण झाले बरे, मृत्यूदर १.४५ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 1:37 AM