नवी दिल्ली : देशात कोरोनाचे ९३.२४ लाख लोक बरे झाले असून, त्याचे प्रमाण ९४.८८ टक्के झाले आहे. या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ९८.२६ लाखांवर पोहोचली असून, सक्रिय रुग्णांचा आकडा साडेतीन लाख आहे. नव्या रुग्णांची संख्याही कमी असून, मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३,५९,८१९ सक्रिय रुग्ण असून, त्यांचे प्रमाण ३.६६ टक्के आहे. कोरोनातून ९३,२४,३२८ जण बरे झाले असून, एकूण रुग्णसंख्या ९८,२६,७७५ आहे. शनिवारी आणखी ३०,००६ नवे रुग्ण सापडले, तसेच या दिवशी कोरोनामुळे आणखी ४४२ जण मरण पावले असून, बळींचा आकडा १,४२,६२८ झाला आहे. कोरोनाच्या नव्या बळींपैकी ७८.०५ टक्के जण हे १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ७ कोटी १५ लाख आहे. त्यातील ४ कोटी ९६ लाख लोक बरे झाले आहेत, तर १६ लाखांहून अधिक जण मरण पावले. अमेरिकेत १ कोटी ६२ लाख कोरोना रुग्ण आहेत. फायझर लसीच्या आपत्कालीन वापराला अमेरिकेची परवानगीफायझर-बायोटेक कंपनीने संयुक्तरीत्या विकसित केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला अमेरिकेने परवानगी दिली. त्यामुळे त्या देशात लवकरच लसीकरणाला प्रारंभ होईल. मॉडर्ना कंपनीने बनविलेल्या कोरोना लसीचे आणखी १० कोटी डोस विकत घेण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे.
CoronaVirus News: भारतातील ९५ टक्के लोक कोरोनामुक्त; सक्रिय रुग्ण साडेतीन लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 2:09 AM