नवी दिल्ली: गेल्या महिन्यात निझामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९६० परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. मरकजमध्ये सहभागी झालेल्या ९६० जणांना काळ्या यादीत टाकण्यात आलं असून त्यांचे पर्यटन व्हिसा रद्द करण्याची कारवाई गृह मंत्रालयानं केली आहे. जमातशी संबंधित असल्यानं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या व्यक्तींविरोधात परदेशी कायदा १९४६ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना गृह मंत्रालयानं दिल्ली पोलीस आणि अन्य राज्यांच्या डीजीपींना दिल्या आहेत. १८ मार्चला निझामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीच्या मरकजचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेकडो तबलिगी सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं. मरकजनंतर बरेचसे तबलिगी देशभरातील त्यांच्या राज्यांमध्ये परतले. मरकजमध्ये सहभागी होण्यासाठी काही तबलिगी पर्यटन व्हिसावर परदेशातून आले होते. पर्यटन व्हिसावर भारतात येणाऱ्या व्यक्तींना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. त्यासाठी दुसऱ्या प्रकारचा व्हिसा आवश्यक असतो.दक्षिण दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये आयोजित मरकजमध्ये तबलिगी समाजाशी संबंधित जवळपास ९ हजार जण सहभागी झाल्याची आकडेवारी सरकारी यंत्रणेला मिळाली आहे. त्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना क्वॉरेंटाईनदेखील करण्यात आलं आहे. यातील ४०० जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. मरकजमध्ये सहभागी झालेले तबलिगी कोणकोणत्या राज्यात गेले, याची आकडेवारी अग्रवाल यांनी दिली. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण १४०० तबलिगी परतले असून त्यातील १३०० जणांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. त्यांना क्वॉरेंटाईन करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.