नवी दिल्ली - देशात कोरोना व्हारसर बधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे प्रवास करण्यास बंदी असताना देखील परराज्यातील कामगार स्थलांतर करत आहे. स्थलांतर करणाऱ्या कामगारांसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
लॉकडाउनचे उल्लंघन करून स्थलांतर करणाऱ्यांना किमान १४ दिवस वेगळ अर्थात विलगीकरणात ठेवावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. देशातील सर्व राज्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशभरात सध्या कामगार मोठ्या संख्येने स्थलांतर करत आहेत.
देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.
दरम्यान राहण्याची आणि अन्न धान्याची व्यवस्था नसल्यामुळे कामगार स्थलांतर करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले की, कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा, त्यात कपात करू नये. तसेच कोणत्याही कामगाराला या स्थितीत घराचे भाडे मागू नये. जे लोक विद्यार्थ्यांना आणि कामगारांना घर रिकामे करण्यास सांगतील, अशा घरमालकाविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर कुटुंबीयांसह स्थलांतर करत आहेत. या कामगारांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहेत.तरी देखील कामगार स्थलांतर करत आहेत. त्यामुळे दिल्ली, जयपूर अशा शहरातून मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतर करत आहेत.