कोलकाता : पश्चिम बंगालमधील खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्या वडिलांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अद्याप अहवाल आला नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली होती. तसेच, बऱ्याचवेळा त्यांनी सोशल मीडियाद्वारे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुसरत जहाँ यांच्या वडिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच, खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांना सोमवारी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नुसरत जहाँ यांच्या वडिलांनी विदेश किंवा दुसऱ्या राज्याचा दौरा केला नाही. मात्र, आज रात्री उशिरापर्यंत त्यांचा वैद्यकीय अहवाल येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट होणार आहे.
नुसरत जहाँ या तृणमूल पक्षाच्या लोकसभेतील खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणतीही अफवा न पसरवता सरकारची मदत केली पाहिजे. सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे सांगत नुसरत जहाँ यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ रुग्ण आढळले आहेत, ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांचा जीव गेला आहे. तर एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.
देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. पण गेल्या १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही.