नवी दिल्ली - आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी भूमी, मजूर,तरलता आणि कायदा यावर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. हे संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे. एक देश म्हणून आपण एका अतिशय महत्वाच्या वळणावर उभे आहोत. हे एवढे मोठे संकट भारतासाठी एक इशारा आहे, तो संदेश आणि संधी घेऊन आला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.
अर्थमंत्र्यांची ही आजची पाचवी पत्रकार परिषद आहे, यात त्यांनी सांगितले की, २० कोटी जनधन खात्यात १० हजार २५ कोटी जमा केले आहेत तर ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिलेत. त्याचसोबत १४०५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिलं जात आहे. तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. २.२ कोटी बांधकाम मजुरांसाठी ३ हजार ९५० कोटी देण्यात आले आहेत. ६.८१ कोटी जनतेला उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस सिलेंडर दिलेत. १२ लाख ईपीएफओ धारकांना आगाऊ रक्कम ऑनलाइन काढता आली असं त्या म्हणाल्या.
राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात पोहचवण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मजुरांना स्थानकांवर आणण्याची विनंती राज्यांना करण्यात आली. केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च उचलला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लोकांना थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, गेल्या काही वर्षांतील उपक्रमामुळे आम्हाला हे करणं शक्य झाले आहे. कोरोना संकटकाळात १५ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. राज्यांना ४ हजार ११३ कोटी रुपये तर आरोग्य कर्मचा-यांना ५० लाखांचे विमा कवच पुरवण्यात आलं आहे. प्रवासी मजुरांना घरी पोहचल्यानंतर काम देण्यात येईल.
आज ७ उपाय करणार आहोत. यात मनरेगा, ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य – शिक्षण, व्यवसाय आणि कोरोना, कंपन्यांचा अधिनियमितकरण, व्यवसाय सुलभ करणे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, राज्य सरकारची स्त्रोत यांचा समावेश आहे. शिक्षकांचे LIVE वर्ग चॅनेलवर दाखवणार आहोत, टाटास्काय व एअरटेलही शैक्षणिक व्हिडीओ दाखवतील, ई-पाठशालांतर्गत २०० नवी पुस्तके आणली. विद्यार्थ्यांसाठी १२ ऑनलाइन चॅनेल सुरु करणार आहोत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. रोजगारास चालना देण्यासाठी आता सरकार मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपये देईल असंही त्यांनी सांगितले.
तसेच सर्व जिल्ह्यांत संसर्गजन्य रोगांचे कक्ष,प्रत्येक तालुक्यात पब्लिक हेल्थ लॅब उभारणार आहे, आरोग्य क्षेत्रासाठी जादा खर्च करणार, ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर असेल असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.