चेन्नई: देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा पावणे दोन लाखांच्या पुढे गेला आहे. यानंतर आता तमिळनाडूनं एक लाखांचा टप्पा पार केला आहे. एक लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेलं तमिळनाडू देशातलं दुसरं राज्य आहे.काल तमिळनाडूत कोरोनाचे ४ हजार ३२९ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख २ हजार ७२१ वर गेला आहे. काल राज्यात सव्वा चार हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यातील २ हजार ८२ रुग्ण एकट्या चेन्नईतील आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तमिळनाडू सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. याशिवाय चेन्नई, कांचीपुरम, चेंगलपट्टू, थिरूवल्लूवरच्या सीमा ५ जुलैपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता चेन्नईनं अतिशय सूक्ष्म योजना तयार केली आहे. या अंतर्गत चेन्नईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक २०० खाटांचं कोरोना हेल्थकेअर सेंटर तयार करण्यात येत आहे. चेन्नई महापालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे. ताप तपासण्यासाठी ४०० हून अधिक कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. यासोबतच कोरोना चाचण्यांसाठी दहा नवे कलेक्शन सुरू केले गेले आहेत. चेन्नईत कोरोनानं टोक गाठल्यावर ३० ते ३५ हजार बेड्सची गरज भासू शकते, अशी माहिती महापालिका आयुक्त जी. प्रकाश यांनी दिली आहे.
CoronaVirus News: महाराष्ट्रापाठोपाठ 'या' राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १ लाखांच्या पुढे; राजधानीनं वाढवली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 8:50 AM