Coronavirus : वय अनुक्रमे ९३ अन् ८८; ‘या’ वृद्ध दाम्पत्यापुढे कोरोनाही झाला नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 11:02 AM2020-03-31T11:02:20+5:302020-03-31T11:11:23+5:30
दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना केरळमधील पठाणमथिठ्ठा जिल्ह्यातून एक चांगली बातमी आली आहे. येथील एका दाम्पत्याने कोरोना व्हायरसविरुद्धची निकराची लढाई जिंकली आहे. उभय जोडप्यापैकी थॉमस यांचे वय ९३ तर मरियम्मा यांचे वय ८८ वर्षे आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांनी देखील या रुग्णांच्या बरे होण्याची आस सोडली होती.
या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली असताना इतरही आजार होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी सहा वेळा आस सोडली होती. मात्र सोमवारी दोघांची टेस्ट घेण्यात आली. त्यात दोघेही कोरोना मुक्त झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. देशात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. आतापर्यंत ३० हून अधिक लोकांना यामुळे जीव गमावला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक वयोवृद्धच आहेत. मात्र केरळमधील वयोवृद्ध दाम्पत्यासमोर कोरोनाला नतमस्तक व्हावे लागले आहे..
रुग्णालयात दाखल केल्यानंतर थॉमस यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. तर मरियम्मा यांना विषाणूचे इन्फेक्शन झाले होते. या व्यतिरिक्त या दाम्पत्यांचा इलाज करत असलेली नर्स देखील कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती. मात्र दाम्पत्याच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना देखील रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या सर्वांना सुट्टी देण्यात आली तेव्हा रुग्णालयात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
दाम्पत्याचा मुलगा आपल्या पत्नी आणि मुलासह २९ फेब्रुवारी रोजी इटलीहून परतला होता. मात्र त्याने कोच्ची विमानतळावर स्क्रिनिंग केली नव्हती. तसेच आपल्या परदेश दौऱ्याविषयी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले नव्हते.