नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि दिल्लीत वाढत आहे. त्यामुळे या शहरांमध्ये सामुहिक संसर्गाची शक्यता वाढत आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये सामुहिक संसर्ग झाला असल्याची शंका आहे. त्यामुळे या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी भीती व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना गुलेरिया म्हणाले की, संपूर्ण देशातील परिस्थिती पाहिल्यास काही शहरे अशी आहेत जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील सत्तर ते ऐंशी टक्के रुग्ण याच शहरांमध्ये सापडत आहेत. सद्यस्थितीत दिल्ली, मुंबई, इंदूर आणि अहमदाबाद येथे कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. तर देशातील इतर भागात कोरोनाचे तितकेसे रुग्ण सापडलेले नाहीत.
देशातील बहुतांश भागात कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाहीत, काही ठिकाणी आता रुग्णसंख्या कमी होत आहे. देशात सामुहिक संसर्ग झालेला नाही. मात्र दिल्ली आणि मुंबईत सामुहिक संसर्ग झाला असावा, अशी शंका आहे. जर दिल्ली आणि मुंबईत सामुहिक संसर्ग झाला असेल, तर त्याला रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे, असे गुलेरिया यांनी सांगितले.
ज्या भागात सामुहिक संसर्ग झाला आहे तेथील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे दिसत नसलेले आहेत. त्यामुळे जे लोक बाहेर पडत आहेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्यासमोर किंवा सोबत जो कुणी आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आहे. तसेच तो आजार पसरवू शकतो. त्यामुळे जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तिथे अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे, असा सल्ला गुलेरिया यांनी दिला