नवी दिल्ली : देश लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना, एअर इंडियाने १९ मे ते २ जून या कालावधीत मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, कोची, जयपूर या शहरांतून विशेष विमाने सोडण्याचे ठरविले आहे. कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागांत अडकून पडलेल्यांना त्यांच्या इच्छितस्थळी नेण्यासाठी ही विशेष विमानसेवा असेल.ही विशेष विमानसेवा म्हणजे देशांतर्गत विमानसेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची नांदी आहे असे कोणीही समजू नये असे एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या शहरी नेऊन पोहोचविण्यासाठी एअर इंडिया विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचा हा दुसरा टप्पा आहे. देशांतर्गत विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून हिरवा कंदिल मिळाला पाहिजे. विशेष विमानसेवेची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल व प्रवाशांना तिकिटांचे आॅनलाइन बुकिंग करता येईल. एअर इंडियाचा एक कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने या कंपनीचे कार्यालय सील करण्यात आले आहे. या कंपनीच्या पाच पायलटनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त नुकतेच झळकले होते. पण दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत या पाच जणांना संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नेमके त्याच वेळेला एअर इंडियाच्या विशेष विमानसेवेची घोषणा झाली आहे. अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या गावी नेण्यासाठी रेल्वे खात्यानेविशेष रेल्वेगाड्या चालविल्या असून त्यात धर्तीवर एअर इंडियाने निर्णय घेतला आहे.असा आहे विशेष विमानसेवेचा आराखडाएअर इंडियाच्या विशेष विमानसेवेच्या अंतर्गत दिल्लीहून जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनौ या शहरासांठी विमाने सोडण्यात येतील. मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, विजयवाडा येथे तर हैदराबादहून दिल्ली, मुंबईसाठी विमाने रवाना होतील. बंगळुरूहून मुंबई, दिल्ली, हैदराबादला विमाने जातील.
coronavirus: एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:27 AM