नवी दिल्ली : देशव्यापी २१ दिवसांच्या लॉकडाउनला सरकार मुदतवाढ देवो किंवा न देवो, १५ मेपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवाव्यात, तसेच धार्मिक सामूहिक कार्यक्रमांवर निर्बंध घालावेत, अशी शिफारस कोविड-१९ वरील मंत्रिगटाने केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा सहभाग होता. मंत्रिगटाच्या बैठकीत असे मत व्यक्त करण्यात आले की, सध्याचा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणार असला तरी १४ एप्रिलपासून किमान चार आठवडे धार्मिक ठिकाणे, शॉपिंग मॉल्स आणि शैक्षणिक संस्थांना नेहमीप्रमाणे कामकाज सुरू करण्याची मुभा देऊ नये.
उन्हाळी सुट्या मे महिन्याच्या मध्यात सुरू होत असल्याने शाळा आणि महाविद्यालये जूनअखेरपर्यंत बंद ठेवण्याबाबत सरकार विचार करीत आहे.कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून सर्व धार्मिक संघटनांना १५ मेपर्यंत कार्यक्रम घेण्याची परवानगी देऊ नये, अशी शिफारस मंत्रिगटाने केली आहे. उद्भवलेल्या स्थितीवर निगराणी ठेवून उपायोजनांबाबत पंतप्रधानांना शिफारस करण्याचे काम मंत्रिगटावर सोपविण्यात आले आहे. मंत्रिगटाने कोरोना संसर्गाच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांतील तपासणी सुविधाबाबत उपाय योजण्याचीही शिफारस केली आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामविलास पासवान, धमेंद्र प्रधान, नरेंद्रसिंह तोमर, रमेश पोखरियाल निशंक, डी.व्ही. सदानंद गौडा, स्मृती इराणी, गजेंद्र सिंह शेखावत यांचीही बैठकीला उपस्थिती होती. (वृत्तसंस्था)