मुंबई - राज्यभरात आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला आहे. तर ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात एकीकडे दिलासादायक आकडेवारी आलेली असताना दुसरीकडे दिवसभरात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ वर गेली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाशी अजून काही दिवस आपला लढा चालणार आहे. या लढाईत प्रत्येकजण आपलं योगदान देतंय.
कोरोना आला अन् जणू हरवेली माणूसकी जागोजागी पाहायला मिळाली. माणसाला माणूस म्हणन वागविण्यासाठी झटताना माणूस दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची श्रद्धास्थान असलेली मंदिरे, मशिदी, चर्चा, गुरुद्वारे आणि इतर प्रार्थनास्थळही बंद करण्यात आली आहे. मनुष्य प्राण्याला एका महाभयंकर रोगापासून वाचविण्यासाठी माणूसच कामाला लागला आहे. बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भितीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येईनात. त्यावेळी, रविशंकर यांच्या घराशेजारील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे आपल्या खांद्यावर त्यांचं प्रेय स्मशानभूमीत घेऊ जाताना... राम नाम सत्य है.. असा रामनामाचा जपही या मुस्लीम बांधवांनी केला. एकीकडे माणूसकीचं हे उदाहरण असताना, दुसरीकडे आपल्या २५ वर्षीय मुलाच्या निधनाचे दु:ख विसरुन एक आई मुलाच्या तेराव्याला मास्कचे वाटप करणार आहे.
कोरोनाच्या लढाईत प्रत्येकजण आपलं योगदान देत आहे, कुठे या संवेदनशील परिस्थितीचा फायदा घेऊन मास्कची साठेबाजी करणारे समाजकंट आहेत. तर, दुसरीकडे आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख सोबत घेऊन मास्क मोफत वाटणारी आई आहे. कुल्लू येथील एका कुटुंबीयांनी माणूसकीचा पाठ शिकवला आहे. बंजार उपमंडलच्या खुंदन गावात राहणारे हे कुटुंब कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. गुमानसिंह आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका हरा देवी रविवारी आपल्या मुलाचा तेरावा घालत आहेत. मात्र, या तेराव्याच्या कार्यक्रमाला जेवण किंवा इतर विधी न करता, याकामी होणारा खर्च गरजूंना आणि गावातील लोकांना २००० मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. परिस्थिती आणि सामाजिक भान ठेऊन या माता-पित्यानं हे दाखवलेलं धैर्य कौतुकास्पद आहे.