मुंबई- लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवलं. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी जवळपास ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंना थेट फोन लावला आणि वांद्र्यात जमलेल्या गर्दीबाबत चिंता अन् नाराजी व्यक्त केली. अशा घटनांमुळे कोरोना व्हायरसच्या विरोधात भारताची लढाई कमकुवत होत आहे. प्रशासनानंही अशा घटना होऊ नयेत, याची काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील सरकारला माझं पूर्ण समर्थन असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी १४ तारखेनंतर ट्रेन सुरू होत आहेत, असे कळल्याने लोकांनी वांद्रे स्टेशनला गर्दी केली. कोणीतरी तसे पिल्लू सोडल्याने हा प्रकार घडला. परप्रांतातील लोकांनी त्यांच्या राज्यात जाण्याची घाई करू नये त्यांची आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला हातात हात घालून करीत असल्याचे ते म्हणाले. राज्यातील जनतेशी मंगळवारी संवाद साधताना त्यांनी वांद्रे येथे घडलेल्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला होता.
Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 9:33 AM