नवी दिल्ली : देशातील कोरोना तिसऱ्या टप्प्यात न पोहोचण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे खूप प्रयत्न करत आहेत. यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाबाबत अफवांचा बाजार उठलेला असताना आता केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने चक्क बॉलिवुडच्या शहेनशहालाच खोटे ठरविले आहे. महत्वाचे म्हणजे अमिताभ बच्चन यांनी कालच हा व्हिडीओ पोस्ट केला होता.
अर्थमंत्र्यांनी आज विशेष पॅकेजची घोषणा केल्यानंतर काही वेळाने आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशात गेल्या २४ तासांत ४२ नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या ६४९ आहे. यापैकी ६०६ रुग्ण हे भारतात राहिलेले आहेत. तर ४७ रुग्ण हे परदेशातून भारतात आलेले आहेत. देशात आतापर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याचवेळी अग्रवाल यांनी देशवासियांना सोशल डिस्टंसिन्गचे कडक पालन करण्य़ाचे आवाहन केले. तसेच सरकारला सहकार्य करून कोरोनाला हरविण्यास सांगितले आहे. ज्या वेगाने कोरोना पसरत आहे ही चिंतेची बाब आहे. हा आकडा शून्यावर आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांना माश्यांमुळे कोरोना व्हायरस पसरतो का, या अमिताभ बच्चन यांच्या व्हि़डीओवरून प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ नाही असे उत्तर दिले. तसेच मी त्यांचे ट्विट पाहिलेले नाही. मात्र, एवढे जरूर सांगू शकतो की व्हायरसचे संक्रमण माश्यांमुळे होत नाही.
काय म्हणाले होते अमिताभ बच्चन?अमिताभ यांनी म्हटले आहे की, चीनने केलेल्या संशोधनाचा हवाला देऊन हे ट्विट केले आहे. आपला संपूर्ण देश कोरोनाविरोधात झुंज देत असूूून चीनच्या संशोधनात दिसून आले आहे की, कोरोना विषाणू मानवी विष्ठेमध्ये कित्येक आठवड्यांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि विष्ठेवर बसलेली माशी जर फळे, भाज्या अथवा अन्य कोणत्याही खाण्यापिण्यासारख्या पदार्थावर बसली तर ते दूषित होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, म्हणूनच उघड्यावर शौचास बसू नका आणि शौचालयाचा वापर करा. आपल्या घरात सुरक्षित रहा, असे या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओतून अमिताभ यांनी आवाहन केले होते.