देशभरात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत होत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेलं असतानाही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोनाच्या या लढ्यात आता उद्योगपती आणि सामाजिक संघटनाही पुढे सरसावल्या आहेत. मोदी सरकारच्या प्रयत्नांना इतर राज्य सरकारेही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आंध्र प्रदेशमधल्या जगनमोहन रेड्डी सरकारनंही मोठा निर्णय घेतला आहे. जगनमोहन रेड्डींनी सर्वच खासगी रुग्णालयांचा ताबा घेण्याचा आदेश दिला असून, तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यास सांगितलं आहे. सर्वच खासगी रुग्णालयं सरकारच्या अंतर्गत आल्यानं आता तिथे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात.आंध्र प्रदेशात कोरोनाचे २३ रुग्ण आढळलेले असून, रेड्डी सरकारनं सतर्कतेची पावलं उचलली आहेत. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीसुद्धा सर्वच खासगी रुग्णालयं सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर खासगी रुग्णालयंही बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना रुग्णालयात पोहोचणं शक्य नसल्याचं कारण पुढे करण्यात आलं होतं. पण आता ती रुग्णालयं पुन्हा तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.सोशल डिस्टन्सिंगद्वारे रुग्णांवर उपचार करणं शक्य असल्याचं सांगत रुग्णालयांमध्ये औषधं आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहणं आवश्यक असल्याचं मुख्य सचिव आर. के. तिवारी यांनी सांगितलं आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गाझियाबाद प्रशासनाने सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यास सांगितले आहे.
Coronavirus: खासगी रुग्णालयांचा ताबा मिळवा अन् विलगीकरण कक्ष सुरू करा, जगनमोहन रेड्डी सरकारचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 5:54 PM