हैदराबाद - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने एका वडिलांवर आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन 88 किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ आली.
आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात ही घटना आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व वाहतूक व्यवस्था बंद आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी एका पित्याला आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन 88 किमी चालत प्रवास करावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर असं या 38 वर्षीय पित्याचं नाव असून ते रोजंदारीवर काम करतात. मनोहर यांचा पाच वर्षांचा मुलगा देवा हा अचानक आजारी पडला. देवाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने त्याला हिंदूपूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान देवाची तब्येत आणखी बिघडली. नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव झाला आणि त्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू झाला. मात्र याच दरम्यान लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक बंद होती. वाहतूक बंद असल्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह हातात घेऊन मनोहरने 88 किलोमीटरची पायपीट करत प्रवास केला. त्यानंतर चित्रावती नदीच्या किनाऱ्यावर आपल्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुंबईतही अशीच एक घटना समोर आली होती. बोरीवली येथील गणपत पाटील नगरात एका अडीच वर्षाच्या चिमुकलीचा अचानक आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या पालकांनी देशहित जपत चक्क खांद्यावरून आपल्या चिमुकलीचा मृतदेह मोजक्या नातेवाईकांसह सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत स्मशानभूमीपर्यंत नेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चिमुकली आजारी होती. दोन वर्षे तीन महिने वय या चिमुकलीचे होते. या चिमुकलीची महापालिकेच्या डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली होती. सुदैवाने तशी कोणतीच लक्षणे आढळली नव्हती. मात्र दुर्दैवाने या आजारपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. दु:खातही पालकांनी सामाजिक भान, देशहित जपत गर्दी न करण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या
coronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती
Coronavirus:...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध
CoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'