हैदराबाद : कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांच्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांनी मच्छीमारांना वित्तीय मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.सरकारी निवेदनानुसार, आंध्रचे मच्छीमार गुजरातेत अडकले असून, त्यांना चांगल्यात चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी गुजारत प्रशासनाला सहकार्य करण्याचीही तयारी दर्शविण्यात आली. मच्छीमारांना मदत मिळते की नाही, हे विविध प्राधिकरणांनी पाहावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.रेड्डी यांनी २१ एप्रिल रोजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंध्रच्या ६,००० मच्छीमारांना मदत करण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छिमारांची सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.आढावा बैठकीनंतर राज्य सरकारने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या चाचण्या युद्धपातळीवर केल्या जात आहेत. मागील २४ तासांत ५,७५७ चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्यांच्या बाबतीत आंध्र प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे.राज्यात प्रति १० लाख लोकसंख्येपैकी ८३० जणांची चाचणी केली जात आहे. राज्यात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या वाढून बुधवारी ८०० झाली आहे.
CoronaVirus: गुजरातमध्ये अडकलेल्या मच्छीमारांना आंध्र देणार प्रत्येकी दोन हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 1:29 AM