बंगळूर : कोरोना व्हायरसचे भारतात आतपर्यंत 83 रुग्ण आढळून आले असून, 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता, लोकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचे दुष्परिणाम लक्षात घेता अनेक महत्त्वाचे कार्यक्रमदेखील रद्द केले जात आहेत. तर या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वार्षिक प्रतिनिधी सभा कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
ही बैठक 15 मार्च ते 17 मार्च दरम्यान बंगळूर येथे होणार होती. या बैठकीला संघाचे सुमारे 1450 प्रतिनिधी उपस्थित राहणार होते. तसेच या बैठकीत संघाचे प्रमुख मोहन भागवत, भैय्याजी जोशी, कृष्णा गोपाळ हे सुद्धा उपस्थित राहणार होते. मात्र कोरोना व्हायरसचा धोका पाहता ही बैठक अचानक शेवटच्या क्षणाला रद्द करण्यात आली आहे.
तर या बैठकीत देशभरातील संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी सहभागी होतात. आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून, मार्च महिन्याच्या अखेर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी भाजपचे अनेक नेते बंगळुरूलाही पोहोचले होते. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपा सरचिटणीस रामाधव आणि भाजपचे संघटनमंत्री बी.एल. संतोष कालच बंगळुरूमध्ये दाखल झाले होते.