नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे.
आतापर्यंत देशात ५१९४ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये अनेक अफवा पसवल्या जात आहेत. याला काही लोक सोशल मीडियावर विरोधही करत आहेत.
कोरोनावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे(AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या टीकेपासून वाचण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, "कोणत्याही योजनेशिवाय लागू केलेला लॉकडाऊन आणि कोरोनापासून नवे शिकाऊ असल्याप्रमाणे टीका टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.... भाजपाच्या प्रचारकांना माहीत पाहिजे की, ते व्हॉट्सअॅप फॉरवर्डच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसला हरवू शकत नाहीत... मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे, हे कोरोना व्हायरसवरील औषध नाही किंवा हा उपलब्ध टेस्टिंगचा पर्याय होऊन शकत नाही..."
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचा संसर्ग एकूण ५१४९ लोकांना झाला आहे. तर १४९ लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, देशातील कोरोना बाधित ४०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांत देशात ७७३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात एक हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात बुधवारी ६० नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत १०७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये फक्त मुंबईत आज ४४ नवे रुग्ण सापडले आहेत.