नवी दिल्ली – देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णसंख्येत हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. लोकांमध्ये कोरोनाबाबत काही प्रमाणात दहशत कमी झाली आहे. कोरोना संपुष्टात येण्याची ही चिन्हे आहेत का? यावर प्रतिक्रिया देताना आपल्याला किमान ६ महिने खूप सतर्क राहणं गरजेचे आहे असं कोविड वर्किंग ग्रुपचे प्रमुख एन के अरोडा यांनी म्हटलं आहे. अद्याप कोरोना गेला नाही. लोकांनी लसीकरण करणं आवश्यक आहे. शाळा बंद करण्याची गरज नाही त्यामुळे नुकसान आहे असं त्यांनी सांगितले आहे.
एन के अरोडा म्हणाले की, कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात आली नाही. जगातील अनेक देश असे आहेत ज्याठिकाणी दिवसाला १ लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. भारतातही रोज कोरोना रुग्णसंख्या समोर येत आहे. ज्यांना याआधीच एखादा आजार असेल आणि त्यांना कोरोना झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळलं पाहिजे. मास्क लावणं गरजेचे आहे. ज्यांनी बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी तो तात्काळ घ्यावा. मुलांना कोरोनाची लस द्या हे उपाय असल्याचं ते म्हणाले. इकोनॉमिक्स टाइम्सनं त्यांची मुलाखत घेतली.
देशात ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट B.4 आणि B.5 दोन आठवड्यापूर्वीच आढळले आहेत. जे या व्हेरिएंटने संक्रमित आहेत त्यांना आयसोलेट केले आहे. जगभरात कुठेही कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला तर तो भारतातही मिळणे निश्चित आहे. या व्हेरिएंट संक्रमणावर लक्ष ठेवणं हे महत्त्वाचे आहे. अद्याप कोरोना गेला नाही. कोरोनाबाबत सतर्क राहणं गरजेचे आहे. जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोवर काळजी घेणं महत्त्वाचे आहे. आपल्याला कुठल्याही संकटाला सामोरं जाण्यासाठी सातत्याने या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला हवं असं एन के अरोडा यांनी म्हटलं.
दरम्यान, कार्यालयात १०० टक्के क्षमतेने उपस्थिती ठेवण्याची परवानगी देण्यापूर्वी सतर्क होऊन विचार करावा लागेल. आपल्याला दैनंदिन कामे करण्याचा प्रयत्न करायला हवा परंतु सर्वप्रकारे काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. शाळा कुठल्याही किंमतीत बंद व्हायला नको. जर शाळा बंद झाल्या तर त्याचे इतर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतील. शाळा बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही एन. के अरोडा यांनी म्हटलं.