लखनौ - एकीकडे देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी जाणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यातील नागफणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हाजी नेब परिसरात हा प्रकार घडला. मोरदाबाद जिल्ह्यातील या क्षेत्रातील एका व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या मृत्यूनंतर आज आरोग्य विभागाचे पथक या परिसरात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आले होते. त्याचवेळी या पथकावर हल्ला करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
माहितीनुसार या परिसरातील लोकांनी जमाव करून 108 मेडिकल ऍम्ब्युलन्सवर हल्ला केला. या हल्ल्यात ऍम्ब्युलन्स कर्मचाऱ्यांसह डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, घटनास्थळावर अजून काही डॉक्टर अडकून पडले असल्याचे वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ऍम्ब्युलन्सचालकाने सांगितले की, जमवातील काही लोकांनी वैद्यकीय पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. हे पथक कोरोनाच्या संशयित रुग्णांचा तपास करून नेण्यासाठी आले होते. हे पथक संशयिताला घेऊन जात असताना अचानक जमावाने ऍम्ब्युलन्सवर दगडफेक सुरू केली.