नवी दिल्ली : क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी देण्यात येणाऱ्या बीसीजी लसीमुळे वृद्ध व्यक्तींमधील प्रतिकारशक्ती वाढते. त्याचा फायदा त्यांना कोरोना संसर्गापासून वाचविण्यासाठी होऊ शकतो असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटले आहे. यासंदर्भात आयसीएमआर केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला. संस्थेने टि्वटमध्ये म्हटले की, बीसीजी लस टोचल्यानंतर वृद्ध व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात. कोरोना संसर्ग होऊ नये किंवा तो झाल्यास त्यातून लवकर बरे होण्यासाठी या वाढीव प्रतिकारशक्तीचा वृद्धांना फायदा होण्याची शक्यता आहे. वृद्धांना बीसीजी लस देऊन त्यांच्या शरीरात वाढलेल्या प्रतिकारशक्तीबाबत आयसीएमआरच्या तज्ञांनी काही निरीक्षणे नोंदविली. कोरोना संसर्ग झाल्यास प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णाची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या बीसीजी लसीचे आणखी सुपरिणाम काय आहेत, याचा सध्या आयसीएमआर अभ्यास करत आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनीही बीसीजी लसीवर आणखी संशोधन सुरू केले आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी बीसीजी लसीचा काही उपयोग होतो का, या दिशेने हे संशोधन सुरू आहे. क्षयरोगाबरोबरच अन्य प्रकारच्या संसर्गाला रोखण्यासाठीही बीसीजी लस उपयोगी पडू शकते असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. बाधित आणि मृतांच्या संख्येत होत आहे घट देशात बुधवारी ४५ हजारांहून कमी कोरोना रुग्ण आढळून आले. या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ८० लाखांच्या घरात पोहोचली आहे तर बरे झालेल्यांची संख्या ७२ लाख ५९ हजारांपेक्षा अधिक आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ९०.८५ टक्के आहे. कोरोनामुळे आणखी ५०८ जणांचा मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या १,२०,०१०वर पोहोचली आहे.रशियात दुसऱ्या लसीचेही उत्पादन सुरूस्पुटनिक व्ही लस बनविल्यानंतर रशिया आता दुसरी कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. या लसीच्या चाचण्या पूर्ण व्हायच्या असल्या तरी उत्पादन करण्यास रशियाने प्रारंभ केला आहे.
coronavirus: बीसीजी लसीमुळे वृद्धांचा कोरोनापासून बचाव, आयसीएमआरने व्यक्त केली शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 7:10 AM