रांची - कोरोना विषाणूच्या भयानक वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशभरात हाहाकार उडालेला आहे. (coronavirus in India) कोरोना रुग्णांची संख्या भयानक वेगाने वाढत असल्याने विविध राज्यांमधील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. अनेक ठिकाणी अगदी गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांनाही बेड मिळणे कठीण झाले आहे. असाच प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. (coronavirus in Jharkhand ) येथे बेड न मिळाल्याने उपचारांविना राहिलेल्या कोरोना पीडित रुग्णाने रुग्णालयाचे निरीक्षण करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्र्यांसमोरच तडफडून प्राण सोडले. (beds not available in hospital, patient dies in front of health minister in Jharkhand)
हा रुग्ण झारखंडमधील हजारीबाग येथून रांचीमध्ये उपचारांसाठी आला होता. मात्र रुग्णालयाच्या पायऱ्यांवरच त्याचा मृत्यू झाला. कोरोनाबाधीत असलेल्या या रुग्णाला डॉक्टरांनी तपासले नाही. पीडित रुग्णाची मुलगी आणि नातेवाईक रुग्णालयाबाहेरून आरोग्य यंत्रणेच्या हातापाया पडत राहिले. मात्र कुणीही त्यांना दाद दिली नाही.
यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ताही तिथे उपस्थित होते. मात्र ते सुद्धा त्यांच्यासमोरून निघून गेले. त्यामुळे मृत व्यक्तीच्या मुलीने राजकारण्यांना खडेबोल सुनावले आहेत. राजकारण्यांना केवळ मतांशी मतलब आहे. ते मला माझे वडील परत मिळवून देऊ शकतात का, असा सवाल तिने विचारला आहे.
मंगळवारी झारखंडचे आरोग्यमंत्री पीपीई किट घालून रुग्णालयाचे निरीक्षण करत होते. येथील परिस्थिती सामान्य असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. मात्र काही वेळातच मंत्रिमहोदयांच्या दाव्याची पोलखोल झाली. हजारीबाग येथून आलेल्या रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना विनंती करत राहिले. मात्र काहीच होऊ शकले नाही. दरम्यान, हा प्रकार समजल्यावर मंत्र्यांनी सारवासारव करत आरोग्य विभागाला दोष देत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा दावा केला.