बंगळुरू: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बऱ्याच दिवसांपासून ठप्प होती. आता काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू झाल्यानं देशभरात अडकलेले मजूर त्यांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. हाती काम नसल्यानं लाखो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपापल्या गावी जाण्यासाठी मजूर हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. अशाच काही मजुरांची गर्दी बंगळुरुत झाली होती. ही गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं काही मजुरांना लाथेनं मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.घरी सोडण्याची मागणी करत काही मजूर बंगळुरूतल्या के. जी. हल्ली पोलीस ठाण्याजवळ जमले होते. आम्हाला उत्तर प्रदेशला सोडण्याची व्यवस्था करा. व्यवस्था होईपर्यंत आम्ही हटणार नाही, असा पवित्रा मजुरांनी घेतली. या मजुरांना उपनिरीक्षक राजा साहेब यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मजूर त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे राजा साहेब संतापले. त्यांनी काही मजुरांच्या कानशिलात लगावली, तर काहींना लाथेनं मारहाण केली.
VIDEO: घरी सोडण्याची मागणी करणाऱ्या मजुरांना पोलीस अधिकाऱ्याची लाथेनं मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 1:26 PM