नवी दिल्ली : चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर, यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. यातच खबरदारी म्हणून कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कर्नाटकातील हुबळी येथील एका बस कंडक्टरने प्रवाश्यांना मोफत मास्क वाटप केले.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील बस कंडक्टर एम.एल. नदाफ आणि ड्राव्हर एच. टी. मयन्नावार यांनी मास्क विकत घेतले आणि यारगुप्पी ते हुबळीला जाणाऱ्या बसमधील प्रवाश्यांना प्रवाश्यांना मोफत मास्क वाटप केले. यावेळी एम.एल. नदाफ यांनी सांगितले की, "कोरोना व्हायरसमुळे लोक प्रवास करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आम्ही मास्क वाटप करण्याचा पुढाकार घेतला. तसेच, लोकांना मोफत मास्क वाटप करावे, यासाठी मी सरकारला विनंती करतो."
चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे देशवासियांना यापासून काळजी घेण्याचे आवाहन राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.
याचबरोबर, कोरोना व्हायसरमुळे आतापर्यंत देशात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, केंद्र सरकारने कोरोनाला भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. यामुळे देशातील सर्व राज्यांमधील सरकारे आता कोरोनाशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) मदत मिळवू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.