नवी दिल्ली: कोरोनाचा (Coronavirus Update) संसर्ग अद्यापही भारतात कायम आहे. देशात चौथी लाट येणार का, यावर आता तर्क-वितर्क लावले जात आहेत. देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बहुतांश प्रमाणात यश येताना दिसत असले, तरी कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट पुन्हा डोके वर काढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनावर प्रभावी असणाऱ्या लसीचे बुस्टर डोसही मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत. यातच आता भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने कोव्हॅक्सिन (Covaxin) कोरोना लसीचे उत्पादन तात्पुरते कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन तात्पुरते कमी करण्याची घोषणा केली. लस खरेदी करणाऱ्या एजन्सींना पूर्ण पुरवठा केला असून, पुढे लसीची मागणी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच येत्या काळात कंपनी प्रलंबित सुविधा, प्रक्रिया आणि सुविधा ऑप्टिमायझेशन यावर लक्ष केंद्रित करेल, असे सांगितले जात आहे.
आता अपग्रेडची गरज आहे
कोरोनाच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीला तोंड देण्यासाठी, कोव्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी, मागील वर्षभरात सतत उत्पादनासह, सर्व विद्यमान सुविधांचा पुनर्वापर करण्यात आल्याने बऱ्याच गोष्टी बाकी राहिल्या होत्या. अशा परिस्थितीत आता अपग्रेडची गरज आहे. उत्पादनादरम्यान काही चांगल्या उपकरणांची गरज होती, मात्र कोरोनामुळे ते उपलब्ध होऊ शकले नाही. तरीही कंपनीने कधीही करोनाच्या लसीच्या गुणवत्तेशी तडजोड केली नाही. येत्या काळात सुधारणा केल्यानंतर लसीचे उत्पादन आणखी वाढेल, अशी अपेक्षा कंपनीकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या डेल्टाक्रॉन व्हेरिअंटने जगभरात पुन्हा हाहाकार उडविला असताना आता नव्या व्हेरिअंट सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याची घोषणा केली असून याचे नाव XE असे ठेवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्हेरिअंटच्या संक्रमणाचा वेग हा BA.2 व्हेरिअंटच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे. डब्लूएचओनुसार आतापर्यंत कोरोनाचे तीन हायब्रिड व्हेरिअंट सापडले आहेत. यामध्ये पहिला XD, दुसरा XF आणि तिसरा XE आहे. यापैकी पहिला आणि दुसरा व्हेरिअंट डेल्टा आणि ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. तर तिसरा व्हेरिअंट ओमायक्रॉनचा सबव्हेरिअंटचा हायब्रिड स्ट्रेन आहे. ब्रिटीश हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या संशोधनात हे प्रकार सापडले आहेत.