जयपूर - कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाला पायबंद घालण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, राजस्थानमधील भिलवाडा शहराने मात्र कोरोनाशी लढण्यासाठीचा एक यशस्वी पॅटर्न देशासमोर ठेवला आहे. या पॅटर्नचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून, हा पॅटर्न देशभरात लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी भिलवाडामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले होते. येथील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि इतर काही कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर येथील शासन आणि प्रशासन सक्रिय झाले. राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्वरित युद्धपातळीवर प्रयत्न केले. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करून शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. त्यानंतर राज्यातील सुमारे 16 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक भिलवाडा येथे पाठवण्यात आले. प्रत्येक घरात जाऊन स्क्रिनिंग करण्यात आले. त्यातून काही कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे शहरात आणि राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मात्र शहरात लॉकडाऊनची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. तसेच लोकांकडून सोशल डिस्टंसिंगचे पालन करऊन घेण्यात आले. तसेच शहरातील 10 लोकांचे स्क्रिनिंग 10 दिवसात करऊन संशयितांना वेगळे करण्यात आले. शहरातील सर्व हॉटेल आणि खासगी हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेतले. येथे कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांना ठेवण्यात आले.
भिलवाड्यामध्ये प्रशासन, पोलीस आणि वैद्यकिय कर्मचारी यांच्या त्रिस्तरीय प्रयत्नांमुळे कोरोनाचा रुग्णांची संख्या 27 वर मर्यादित राहिली. या 27 रुग्णांपैकी 20 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर उर्वरित 7 जण लवकरच बरे होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भारत सरकारनेसुद्धा राजस्थान सरकारच्या भिलवाडा पॅटर्नची प्रशंसा केली आहे. तसेच हा पॅटर्न देशभरात लागू करण्याचे संकेत दिले आहेत.