नवी दिल्ली : बँक आणि आर्थिक सेवा पुरविणारे कर्मचारी देशाला कोरोनाच्या संकटामध्ये अविरत मदत करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला कमीतकमी नुकसान व्हावे यासाठी प्रयत्नशील आहोत. जी २० देशांपेक्षा मजबूत अर्थव्यवस्था असून सर्व घडामोडींवर आरबीआयची नजर आहे. यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे आश्वासन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिले. अंधारलेल्या काळात आपल्याला प्रकाशाकडे पहायचे आहे, असेही दास म्हणाले.
नाबार्ड, सीडबी सारख्या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था आणि खासगी क्षेत्रातील बँका यांना मदत करण्यात येत आहे. १५००० कोटी रुपये सीडबीला देण्यात येत आहेत. कर्जाची पुर्नगठनासाठी हे पैसे देण्यात येत आहेत. १०००० कोटी एनएचबी, आणि २५००० कोटी रुपये नाबार्डला देण्यात येणार आहेत. ही एकूण मदत ५०००० कोटींची असणार आहे, असे दास यांनी सांगितले. एलसीआर १०० टक्क्यांवरून घटवून ८० टक्के करण्यात आला आहे. लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असेही दास म्हणाले.
रिव्हर्स रेपो रेट
रिव्हर्स रेपो रेट मध्ये कपात करण्यात आली असून २५ बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता हा रेपो रेट ४ वरून ३.७५ वर आला आहे. रेपो दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. याचा फटका बँकांना बसणार आहे.
यंदा पाऊसही १०० टक्के होणार आहे. हे दिलासादायक आहे. कोरोनाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. आरबीआय देशात नवीन छापलेले चलन आणत आहे. कोरोनामुळे निर्यात घटली आहे. तसेच वीजेची मागणीही कमी झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये विक्री घटली आहे. बाजारात चलनाची कमतरता भासू न देणे. बाजारांचे कामकाज प्रभावित न होऊ देणे हे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. आपला डेटा सांगतोय की, इंटरनेट बँकिंगद्वारे चांगले काम होत आहे. अडचणींमध्येही एटीएमद्वारे चांगले काम होत आहे. जागतिक मंदीच्या संकटात २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक राहणार असून १.९ टक्के राहिल असा अंदाज आहे, असे दास यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविल्याने देशाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होणार आहे. २० एप्रिलनंतर काही उद्योगांना परवानगी देण्यात येणार आहे. पहिल्या लॉकडाऊन काळात आरबीआयने रेपो दरात कपात करत ईएमआयमध्ये सूट देण्याचीही विनंती केली होती. शक्तीकांत दास यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेतली.
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास सर्व व्यवसाय बंद आहेत. यामुळे देशाला दररोज ३५ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यामध्ये देशाच्या विकास दराला ८ लाख कोटींचा फटका बसला होता. जगभरातील अर्थव्यवस्थांना कोरोनाच फटका बसला असून त्या देशांप्रमाणेच रिझर्व्ह बँकही उपाययोजना करत आहेत.
सिडबी म्हणजे कोणती बँक?
सिडबी ही लघु उद्योजकांना कर्जपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली बँक आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक असे या बँकेचे नाव असून १९९० मध्ये तिची स्थापना करण्यात आली होती. या बँकेद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निधी पुरविणे, सबसिडी देणे आदी कामे करण्यात येतात. ही बँक नाबार्ड सारखेच काम करते.