जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1900 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. मृतांचा आकडा वाढत असताना दिलासादायक घटना समोर येत आहेत. एका तरुणाने 10 दिवसांनंतर कोरोनाविरोधातला लढा जिंकला आहे.
कोरोनामुळे अनेक जण धास्तावले आहेत. मात्र कोरोना हरणार असून देश जिंकणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बिहारमधील एका तरुणाने कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला काही दिवस होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये हा तरुण स्कॉटलंडहून भारतात परतला होता. मात्र त्याला त्रास होत असल्याने 20 मार्चला त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.
21 मार्चला तरुणाला सर्दी, खोकला, ताप असल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये त्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. रुग्णालयात 10 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. चार, पाच दिवसांपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केली आणि ती टेस्ट निगेटिव्ह आली. 2 दिवसांनी परत टेस्ट करण्यात आली. टेस्टचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह आला. दोन्ही कोरोना टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. मात्र आता 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कोरोनाविरोधातील लढा तरुणाने अखेर 10 दिवसांनी जिंकला आहे. त्यानंतर त्याने इतरांनाही कोरोनाला घाबरू नका असं सांगत त्यांचं मनोधैर्य वाढवलं आहे. 'ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, त्यांनी याचा बिनधास्तपणे सामना करा. कोरोनाला अजिबात घाबरू नका. कोरोनाग्रस्तांनी संयम बाळगावा. तसेच डॉक्टर जे सल्ला देत आहेत, त्याचं तंतोतंत पालन करा' असा सल्ला तरुणाने इतरांना दिला आहे. तसेच तरुणाने कोरोनावर मात केल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही याचा खूप आनंद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू
Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त
coronavirus : पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद