नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाचा भारतात होणारा संसर्ग पाहून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने योग्य वेळी निर्णायक पाऊल उचललं नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच सरकारच्या असक्षमतेची मोठी किंमत सगळ्या देशाला चुकवावी लागेल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर निशाणा साधला आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं असा सल्ला बिप्लब देब यांनी दिला आहे. 'आपलं सरकार निर्णायक रुपात काम करण्यासाठी असक्षम आहे. त्याची भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल. कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी त्वरीत आक्रमक पावलं उचलायला हवीत' असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर देब यांनी ट्विटरवरून त्यांना कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहण्याचा सल्ला दिला आहे.
'संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग सुरू आहे. अॅडव्हायजरी अगोदरपासूनच जारी करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उघडलेले आहेत. सरकार अगोदरच कोरोनाविरुद्ध आक्रमक पावलं उचलत आहे. कृपया याबद्दल अधिक माहितीसाठी कार्टून नेटवर्क सोडून न्यूज चॅनलवर जा' असं ट्विट बिप्लब देब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधवारी दुपारी 2,19,033 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 82909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे.
देशाला केवळ कोरोनापासूनच धोका नसून एक मोठं संकट भारतासमोर असल्याचं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. कोरोनासोबतच तोंडासमोर असलेलं आर्थिक संकट हेही प्रचंड मोठं असून त्यासाठी आपल्याला तयार असणे गरजेचं आहे. कारण, आर्थिक संकटामुळे भारतीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असे ते म्हणाले होते.राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक स्थितीचा उल्लेख करत मोदी सरकारला लक्ष्य केले होते. अंदमान निकोबारमध्ये त्सुनामी येण्यापूर्वी पाणी खाली गेले होते. अगदी तसंच आता सर्वकाही खाली गेलंय. लवकरच एक मोठा त्सुनामी येणार आहे, असे राहुल यांनी म्हटले होते. पुढे काय होईल, याबाबत सरकारला काहीच माहित नाही. मी पहिल्यापासूनच म्हणतोय, देशात आर्थिक त्सुनामी येणार आहे. मी सातत्याने याकडे लक्ष वेधत आहे, जाणीव करून देत आहे. मात्र, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारकडून मूर्ख बनविण्यात येत आहे. पुढे आर्थिक स्थिती अतिशय खराब होईल, असंही राहुल यांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: हाहाकार! इटलीमध्ये 24 तासांत 475 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; विद्यार्थी बनले डॉक्टर
Coronavirus : खाजगी कंपन्यांवर बडगा, कार्यालयांत जाऊन पालिकेची कारवाई
Coronavirus : हातावर शिक्का मारल्यानंतर पुढे काय? प्रवाशांमध्ये संभ्रम
Nirbhaya Case: 'आम्हाला फासावर लटकवून देशातील बलात्कार थांबणार नाहीत पण...'