नवी दिल्ली – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजाराहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सामान्य लोकांपासून अगदी अतिमहत्त्वाच्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांमध्ये कोरोनाची दहशत आहे. यातच भाजपाचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवीराजे शिंदे यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईमध्ये कोरोनाची लक्षण दिसत असल्याचं सांगण्यात येत आहे. न्यूज एजेंसी आयएएनएसने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. दिल्लीतील रुग्णालयामध्ये ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही तब्येत बिघडल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत केजरीवालांचा कोरोना रिपोर्ट येणार आहे.
मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. गेल्या २ दिवसांपासून त्यांना ताप आणि खोकला येत आहे. रविवारी दुपारपासून अरविंद केजरीवाल यांनी आपल्या बैठका रद्द केल्या आहेत. तसेच, ते कोणालाही भेटले नसून त्यांनी स्वत: ला आयसोलेट केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीची बातमी समजताच अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली होती.
दरम्यान, महाराष्ट्रातही दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पडून त्याठिकाणी भाजपाचं सरकार आलं. शिंदे समर्थक काँग्रेस आमदारांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्यानं तत्कालीन काँग्रेस सरकार अल्पमतात आल्यानं कोसळलं. ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे त्याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. त्यापूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मात्र ज्योतिरादित्य शिंदे रुग्णालयात दाखल असताना दुसरीकडे काँग्रेसने गुना येथील भाजपा खासदार के.पी यादव यांच्याशी वाटाघाटी करत असल्याचं समजत आहे, के.पी यादव यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांना हरवलं होतं. ज्योतिरादित्य शिंदे भाजपात आल्यापासून के.पी यादव आणि शिंदे कधीही एकसाथ पाहायला मिळाले नाहीत, त्यामुळे के.पी यादव नाराज असल्याचीही चर्चा ऐकायला मिळते.