प्रयागराज - देशात कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊन सातत्याने वाढत असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेला मजूरवर्ग मिळेल त्या साधनाने आपल्या मूळ गावाकडे धाव घेत आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी मजुरांकडून ट्रक, टेम्पो अशा साधनांचा वापर होत असून, अशा वाहनांना अपघात होत असल्याच्याही घटना घडत आहेत. दरम्यान, परवा उत्तर प्रदेशमधील औरेया येथे झालेल्या अपघातानंतर या अपघातात मृत्यूमुखी पडलेले मजूर आणि जखमींना मोठ्या हालअपेष्टांचा सामना करावा लागला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले मजूर आणि जखमींची मोठ्या प्रमाणात हेळसांड झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना आणि जखमी मजुरांना एकाच ट्रकमधून त्यांच्या मुळगावी झारखंड येथे पाठवण्यात येत असल्याचे समोर आले.
दरम्यान, या प्रकाराबाबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर उत्तर प्रदेशचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर ट्रकमधून मृतदेह काढून शववाहिनीत ठेवून पुढे पाठवण्यात आले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अत्यंत संतप्त ट्विट केले होते. हा प्रकार अमानवीय असून, अत्यंत संवेदनाहीन आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना आवाहन आहे की, त्यांनी मृतदेहांना सन्मानपूर्वक झारखंडच्या सीमेपर्यंत पाठवावेत.
उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यात एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात 24 मजूर ठार झाले होते. तसेच 15 लोक जखमी झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या