बलवंत तक्षक चंदीगड : हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यात रानीताल येथे वीर सिंह या व्यक्तीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर खांदा द्यायला कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे या मुलाने खांद्यावर मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे ही मृत महिला भंगवार पंचायतीच्या सरपंच राहिलेल्या आहेत.
वीर सिंह यांनी सांगितले की, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर मालकांना विचारणा केली. मात्र, कोणीही तयार झाले नाही. त्यानंतर त्यांनी मृतदेह खांद्यावर नेला. यावेळी कोणीतरी हा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि ग्रामीण भागातील लोकांच्या संवेदनहीनतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भंगवार पंचायतीचे उपसरपंच राजीव कुमार यांनी सांगितले की, संसर्ग झालेल्या महिलेच्या मृत्यूची माहिती आम्हाला देण्यात आली नाही. महिलेचे घर, गाव, रस्ते पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात आले आहेत.