भोपाळ - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे यंदा देशातील लाखो विवाह सोहळे लांबणीवर पडले आहेत. काही ठिकाणी सामंजस्याने विवाह सोहळा टाळण्याचा किंवा अगदीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडला जात आहे. मात्र काही ठिकाणी शेकडो लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे पार पडत आहेत. अशाच एका थाटामाटात झालेल्या विवाह सोहळ्यात चक्क वधूचे भावोजीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वधुवरांसह विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या दोन्ही कुटुंबातील १०० नातेवाईकांनाच क्वारेंटाईन व्हावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमधील छिंदवादा येथे एक विवाह सोहळा पार पडला. वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कुटुंबातील १०० हून अधिक नातेवाईकही सहभागी झाले होते. तसेच आपल्या मेव्हणीला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत असलेले तिचे भावोजीसुद्धा आले होते.
दरम्यान, विवाह सोहळा पार पडल्यानंतर दिल्लीहून आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. ही व्यक्ती नववधूचे भावोजी असल्याचे समोर आले.त्यानंतर नवदांपत्यासह दोन्ही कुटुंबातील १०० नातेवाईकांना क्वारेंटाईन होण्याची सूचना करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाने या सीआयएसएफ जवानाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची क्वारेंटाईन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली असून, जिल्ह्यातील दोन ठिकाणांना कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले आहे.
सीआयएसएफचा हा जवान २०-२१ मे दरम्यान, जिल्ह्यात आला होता. त्याची हेल्थ स्क्रीनिंग छिंदवाडा- होशंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर करण्यात आली होती. नंतर तो छिंदवाडा येथील जुन्नारदेवमधील लालबाग आणि एकता कॉलनीमधील काही लोकांना भेटला होता. याबाबतची अधिक माहिती आता मिळवली जात आहे.