अहमदाबाद - गुजरातमधील वलसाड शहरामध्ये एका नवविवाहित जोडप्याची लग्नानंतरची पहिली रात्र तुरुंगात गेली. हे नवदाम्पत्य कोरोना प्रतिबंधक नाईट कर्फ्यूदरम्यान लग्न करून येत होते. त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर लोकही होते. दरम्यान, वाटेत त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन न केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले.
त्यामुळे लग्नाची पहिली रात्र दोन्ही पती-पत्नींना तुरुंगात राहून घालवावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार हा विवाह सोहळा वलसाड शहराबाहेरील एका फार्महाऊसमध्ये झाला होता. दरम्यान, लग्नसोहळा आटोपून वधू-वर हे कुटुंबासोबत घरी येत होते. त्याचवेळी ही घटना घडली. पोलिसांनी कोरोना गाईडलाईन्सचे पालन न केल्याप्रकरणी वधू-वरांसह अन्य वऱ्हाड्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वऱ्हाड्यांना पोलीस स्टेशनवरून जामिनावर मुक्त करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोप केला की, जेव्हा या वऱ्हाड्यांना अडवण्यात आले. तेव्हा वर पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला. तर वराने सांगितले की, काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना येण्यास उशीर झाला होता. कुटुंबीयांनी पोलिसांना विनंतीही केली की, वऱ्हाड्यांना थांबवा, पण वधू-वरांना जाऊ द्या. मात्र पोलिसांनी ही विनंती धुडकावून लावली. तसेच त्यांच्यासोबत गैरवर्तन केले आणि पोलीस ठाण्यात नेले.