पणजी : सद्य परिस्थितीत लॉकडाऊनच्या काळात गोव्यात अडकलेल्या ६ हजाराहून अधिक लोकांची विशेष व्यवस्था करून त्यांच्या देशात रवानगी करण्यात आली होती, परंतु तशी व्यवस्था करूनही १२०० विदेशी पर्यटक अजून गोव्यातच राहिले आहेत. त्यांना गोवा सोडावा असे वाटतच नाही ही वस्तुस्थिती आहे आणि गोवा पोलीस मुख्यालयातील विदेश विभागानेही याला पुष्टी दिली आहे.
२२ मार्च ते २६ एप्रिल या दरम्यानच्या काळात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एकूण ६११७ विदेशी नागरिकांना विशेष व्यवस्था करून त्यांच्या देशात पाठवणी करण्यात आली. या लोकांत ब्रिटीश नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. ब्रिटीश २३३९, रशियन ११७३, जर्मन ६९२, फ्रेंच २४० तर इटलीतील १५६ नागरिकांचा समावेश होता. जे नागरिक गोव्यात अजून राहिले त्यातही याच देशतील नागरिकांची संख्या अधिक आहे. या नंतरही १२०० विदेशी लोक गोव्यात राहिले असल्याचे विदेश विभागाला आढळून आले आहेत. ते मुख्यत: युरोपमधील आहेत. इंग्लंड, जर्मनी, रशिया आणि इटालीतील अधिक आहेत. त्यापैकी काहींचा गोव्यात व्यवसायही आहे तर काही जण अन्य कारणासाठी जाऊ इच्छित नाहीत अशी माहिती विदेश विभागाकडून देण्यात आली.
गोव्यातही लॉकडाऊनजाहीर करण्यात आले तेव्हा अनेक विदेशी नागरिक गोव्यात अडकून पडले होते. कारण भारतातून विदेशात होणारी विमनानांची उड्डाणे रद्द झाली होती. त्यामुळे विशेष व्यवस्था करून अशा नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी करण्यात आली होती. विदेशी नागरिक राहत असलेली हॉटेल्स, रिसॉर्ट व पर्यटन शॅक मालकांना सी फॉर्मद्वारे माहिती देण्यात सांगितले होते. विदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढीसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली होती असे या विभागाचे अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी दिली.सुरक्षेसाठी गोव्यातसहा हजारांहून अधिक विदेशी लोकांना जेव्हा त्यांच्या देशात जाण्याची व्यवस्था करण्यात आली तेव्हा १२०० लोक गोव्यात राहिले याची कारणे अनेक आहेत. काहींचे गोव्यात उद्योगही आहेत. परंतु महत्त्वाचे कारण म्हणजे जगभर कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेला असताना गोव्यात केवळ ७ संसर्गित सापडले व तेही नंतर बरे होऊन घरी गेले. त्यामुळे गोवा हा कोरोनाच्या धोक्यापासून सुरक्षित वाटल्यामुळेच गोव्यात राहणे काहींनी पसंत केले. कारण गोव्यात राहिलेल्या १२०० विदेशींत उद्रेक झालेल्या इटली, यूके आणि चीनचे नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत.
गोवा हेच माझे घरहणजूण येथे वास्तव्याला असलेल्या विकी नालान या महिलेशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने गोवा न सोडण्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या, ‘गेली तीन वर्षे मी गोव्यातच आहे. त्यामुळे गोवाच माझे घर आहे. माझे आईबाबा यूकेमध्ये आहेत. गोवा खूप सुरक्षित आहे. त्यामुळे आणखी कुठेही जावेसे वाटत नाही. मी पुस्तके वाचते, आॅनलाईन इंग्रजी क्लासेस घेते.’